श्रीरामपूर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक निमगाव शाळेत नुकतेच थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन तसेच हात धुवा दिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थी पियुष जाधव हा होता.सुरुवातीला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच शाळेत सुसज्ज व स्वतंत्र बालवाचनालय सुरू करण्यासाठी सर्व पालक व ग्रामस्थांनी मदत करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्त मनोगते व्यक्त केली. शिक्षिका सुधा गमे यांनी हात धुवा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस पटकाविले. विद्यार्थी व शिक्षकांनी पुस्तकांचे वाचन केले.हात धुवा गीताचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली साबळे, महेंद्र साबळे, अंगणवाडी सेविका अनिता काजळे,अर्चना पंडित, वैशाली सोनवणे, निर्मला ढोबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संतोष वाघमोडे,प्रतिभा तोरणे,मिना निकम,सुधा गमे यांनी परिश्रम घेतले.


