श्रीरामपूर : अपघातात जबर जखमी होऊन रक्तभंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तीन व्यक्तींना श्रीरामपूर 'आरटीओ'तील कर्तव्यावर निघालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कु निकीता पानसरे यांनी स्वतः उचलून गाडीत बसविले व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांच्या हाताला व गणवेशास लागलेल्या जखमी व्यक्तींच्या रक्ताच्या डागांची देखील पर्वा केली नसून, मानवतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीरामपूर-बाभळेश्वर सोमवारी (दि.२५) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. अपघातग्रस्त वाहनांतील तीन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्यापैकी दोन जणांना अतिरक्तस्त्राव होत होता. रस्त्यावर अंमलबजावणी कामावर निघालेल्या मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नजरेस त्या व्यक्ती पडल्या. इंटरसेप्टर वाहनात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अडचण येत होती. परंतु, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दुसरे वाहन थांबवून त्यात ताडपत्री अंथरून तीनही जखमींना नजिकच्या प्रवरा रुग्णालयात तातडीने दाखल केले.