श्रीरामपूर : गोंधवणीतील महादेव मंदिरालगतच्या नगरपालिका शाळा क्र.३ च्या प्रांगणात शनिवारी (दि.४) भरलेल्या 'बाल आनंद बाजार' उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, गृह उपयोगी वस्तूंची विक्री करून व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला. यनिमित्ताने मुलांनी नफा-तोटा, नुकसान, पैशाची देवाण-घेवाण असे व्यवसायातील बारकावे अनुभविले. आनंद बाजार उपक्रमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी आणि चार भिंतीतील शिक्षणाव्यतिरिक्त कृतियुक्त व्यावसायिक शिक्षण मिळाल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
पालिका शाळा क्रमांक तीनच्या शाळा प्रशासनाने आयोजित केलेल्या 'आनंद बाजार' उपक्रमाचे उदघाटन पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी फित कापून केले. यावेळी पालिका शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन, संभाजी त्रिभुवन, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ खंडागळे, मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, शिक्षक राजू गायकवाड, सचिन डोखे, पल्लवी बोरुडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी सर्व बाल विक्रेत्यांशी संवाद साधला. मुलांनी शेतातील हिरवा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. मेथी, कोथिंबीर, कांदा पात, शेवगा शेंगा, शेपू, फ्लॉवर, कांदे, फळे, गृह उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले. ग्रामस्थांसह पालकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
याप्रसंगी पालिका शाळेचे शिक्षक सोमनाथ काळे, सौरभ वाणी, प्रशांत पठाडे, अमोल कल्हापुरे, श्री भिसे यांनी आनंद बाजारास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.