श्रीरामपूर : येथील खासदार गोविंदराव आदिक सभागृह येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन या शाखेतर्फे आयुरकॉन २०२५ ही आयुर्वेद डॉक्टरांची राष्ट्रीय परिषद आयोजन १२ जानेवारीस करण्यात आले आहे.
कॉन्फरन्सचे उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव व राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व डॉक्टर सतिष भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कॉन्फरन्समध्ये एन. सी. आय. एम. च्या एथिक्स व पंजीकरण बोर्डचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा, धन्वंतरी पुरस्कार आयुष मंत्रालयाने सन्मानीत डॉ. रामदास आव्हाड, आ. हेमंत ओगले, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपाध्यक्ष करण ससाणे व आयुष मंत्रालयाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतातील १००० डॉक्टर प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. वंध्यत्व व आयुर्वेद, त्वचा, विकार, सांधे, मणके, विकार, पंचकर्म, परदेशात आयुर्वेदाच्या उपचारास संधी व पंचकर्माचे प्रात्यक्षिक आदी विषयावर व्याख्यान होणार आहेत.
यावेळी नागरीकांसाठी श्रीरामपूर आयुर्वेद डॉक्टर असोसिएशनने भव्य आयुर्वेद आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तेथे मोफत प्रकृती परीक्षण करून प्रकृतीनुसार आहार काय घ्यावा, आदर्श जीवनशैली कशी असावी, कोणते पंचकर्म उपयुक्त आहे. योगासने व व्यायाम याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आयुर्वेद वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध कंपन्यांचे ४० स्टॉल मधून आयुर्वेद औषधाची माहिती दिली जाईल. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सतीष भट्टड, नगर जिल्हा महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे सचिव डॉ. स्वप्निल नवले, श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र बोर्डे यांनी केले आहे.