अहिल्यानगर : दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून इच्छुक अर्जदारांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या धनाकर्षासह अर्ज रोखपाल विभाग खिडकी क्रमांक २० येथे जमा करण्याचे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे.
अर्ज सादर करताना वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक धनाकर्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर याचे नावे असणे आवश्यक आहे.
एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमाकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशा अर्जदारांनी १ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता पसंती क्रमांक शुल्काच्या धनाकर्षाव्यतिरिक्त जादा रक्कमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सिलबंद करून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित राहावे.
चारचाकी परिवहनेत्तर (खाजगी) वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी परिवहनेत्तर चार चाकी वाहन असणाऱ्या शुल्काच्या तीन पट शुल्क भरुन नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करता येतील. मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चारचाकी वाहन यांसाठी अर्ज प्राप्त झाल्यास, सदर क्रमांक दुचाकी अर्जदार व चारचाकी अर्जदार यांपैकी ज्या अर्जदाराची एकूण रक्कम जास्त असेल अशा अर्जदारांना देण्यात येईल.
वाहन क्रमांकाला अंतिम मान्यता मिळण्यापुर्वी पसंती क्रमांक शुल्कात वाढ झाल्यास जादा वाढ झालेली रक्कम वाहन मालकाला भरणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. आकर्षक क्रमांकासाठी विहित केलेल्या शासकीय शुल्काबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे खिडकी क्रमांक २० वर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
पसंती क्रमांक शुल्क भरतांना वितरकांच्या स्तरावर वाहन नोंदणी करतांना आधार क्रमांकाशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक असल्याने सदर भ्रमणध्वनी क्रमांकच पसंती क्रमांकाच्या अर्जावर नमुद करावा. दूसरा भ्रमणध्वनी नोंदविल्यास वाहन नोंदणी वेळी अडचण निर्माण होऊ शकते याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही कळविण्यात आले आहे.