पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका सध्या पुणे येथील दिशा एजन्सीला देण्यात आला आहे. या एजन्सीमार्फत सुमारे ३०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. शुक्रवारी दुपारी डावखर चौकात कचरा साचला असल्याबाबतची तक्रार एका नागरिकाने पालिकेत नोंदविली होती. त्यची दखल घेत कामाची वेळ संपल्यानंतरही सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरा गाडी पाठविण्यात आली. या गाडीवर निलेश विठ्ठल पवार (वय ३४) हे कर्मचारी होते. कचरा जमा केल्यानंतर निघाले असता एका माजी नगरसेवकाच्या पुनत्याने त्यांना अडविले. रस्त्यावरील सर्व कचरा जमा कर असे म्हणत त्यांनी गाडीची चावी काढून घेतली. मी तक्रारीवरून कचरा नेण्यासाठी आलो. इतर कचरा उद्या सकाळी घंटा गाडी येईल. याचा राग आल्याने त्याने पवार यांना गाडीच्या बाहेर ओढत खाली पाडून बेदम मारहाण केली. पवार सध्या कामगार रूग्णालयात उपचार घेत आहेत.
ही माहिती समजताच सफाई कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आयुब सय्यद व खोब्रागडे यांची भेट घेतली. जिल्हा नगर पालिका कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस जीवन सुरूडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पालिका प्रशासनाने कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सय्यद यांनी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याशी चर्चा केली. मुख्याधिकारी यांनी घटनेचा पंचनामा करून खोब्रागडे यांना अहवाल सादर करण्या सांगितला. शिवाय गुन्हा दाखल करण्याबाबत रितसर कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.
घडलेला प्रकार चुकीचा असून याबाबीची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मी आरोग्य विभागाच्या प्रमुखांना पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले असून गुन्हा दाखल करण्यासंबंधीही सुचना केल्या आहेत. नागरिकांनी देखील काही तक्रारी असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा. कायदा हातात न घेता सहकार्य करावे.
--सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगर पालिका