श्री
श्रीरामपूर : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे गोंधवणी रस्त्यालगतच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, मृत जनावरे अडकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. यासंदर्भात विविध प्रसार माध्यमात वृत्त झळकले होते. 'साईकिरण टाइम्स'नेही 'आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कालव्याचे गटारीत रुपांतर ; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भावही वाढला' या मथळ्याखाली दि.१६ रोजी वृत्त प्रसारित केले होते. दरम्यान, पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत कालव्याची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या प्रवरा डावा तट कालव्यास पाण्याचे आवर्तन चालु असल्याने या कालव्याचा नॉर्दन ब्रॅंचपासुन निर्माण झालेला उप कालवा हा वॉर्ड क्रं.१ व २ मधून गोंधवणीरोड मार्गे शिरसगांवकडे जातो. मात्र, पाण्याचे रोटेशन चालु असल्याने या कालव्यात मोठ्या प्रमाणातील घाण- कचरा हा गोंधवणी रोड स्थित कालव्याच्या छोट्या पुलाखाली अडकल्याने या कालव्याचे अक्षरशः गटारीत रुपांतर झाल्याचे बघावयास मिळत होते. या घाण-कचऱ्यासह, मेलेली जनावरे देखील असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला.