श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) : सध्या प्रवरा डावा तट कालव्यास पाण्याचे रोटेशन चालु असल्याने या कालव्याचा नॉर्दन ब्रॅंचपासुन निर्माण झालेला उप कालवा हा वॉर्ड क्रं.१ व २ मधून गोंधवणीरोड मार्गे शिरसगांवकडे जातो. मात्र, पाण्याचे रोटेशन चालु असल्याने या कालव्यात मोठ्या प्रमाणातील घाण- कचरा हा गोंधवणी रोड स्थित कालव्याच्या छोट्या पुलाखाली अडकल्याने या कालव्याचे अक्षरशः गटारीत रुपांतर झाल्याचे बघावयास मिळत आहे.
या घाण-कचऱ्यासह, मेलेली जनावरे देखील असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नगर पालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच शहरातील नागरीकांना अशा बिकट समस्यांचा सामना करणे भाग पडत असल्याचे परिसरातील नागरीकांकडून बोलले जात आहे.
आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे भविष्यात शहरामध्ये रोगराईची साथ फैलावून नागरीकांना मोठ्या आरोग्य समस्यांचा सामना करणे भाग पडण्याची शक्यता ही नाकारता येवू शकत नसल्याने नगर पालिका प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष केंद्रित करुन नागरी समस्यांचे निवारण करावे, अशी देखील मागणी केली जात आहे.
पूर्वी पिण्याचे पाण्याचे रोटेशन घेण्यापूर्वी कालव्याची साफसफाई केली जात होती. मात्र, यावेळी अशी कोणती सफाई केली न केल्याने केली गेल्याने कालव्यातील कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच पाणी आल्याने आता हा कचरा सोडून त्याला दुर्गंधी सुटली आहे. हेच पाणी तलावात देखील जात आहे. त्यामुळे शहरवासीयांना सुद्धा हे घाण पाणी प्यावे लागणार आहे.