श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शहरवासियांना रोज मरणयातना भोगाव्या लागत होत्या. आकार्यक्षम पालिका प्रशासन व रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या मुजोर कंत्राटदारांनी श्रीरामपुकरांचा अक्षरशः छळ चालविला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची तर पुरती चाळणी झाली असून, येथे ठिकठिकाणी पडलेले खड्डे, बंद असलेले सिंग्नल आणि वाहतुकीची दिवसरात्र होणाऱ्या कोंडीमुळे घरातून गेलेली व्यक्ती घरी परत येईल का नाही, याची कोणतीही शास्वती राहिलेली नव्हती. दरम्यान, पालिका हद्दीतील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही ठिक-ठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची बाराही महिने अत्यंत दयणीय अवस्था होत असल्याने शहरातील रस्त्यांवर शेती करण्याची परवानगी मिळावी. निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्याच-त्याच ठेकेदारांना रस्त्यांची कामे देऊ नये, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन केली होती.
शहरातील जनता नगरपरिषदेकडे विविध कर भरूनही पालिका प्रशासन शहरवासियांना नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. नेवासा रस्त्यावरील रेल्वे, बस स्थानक परिसर, म. गांधी चौक परिसर ठिक-ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. बोरावके महाविद्यालय लगतचा इंदिरा नगरकडे जाणारा रस्ता जागोजागी उखडला आहे. दशमेश चौक परिसरात जागोजागी खड्डे पडले असून या ठिकाणी वाहतुकीची कायमच कोंडी होते.
रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असताना पालिका प्रशासन कंत्राटदारांवर कारवाई का करत नाही? निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही? दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांनाच रस्त्यांची कामे कशी दिली जातात.? शहरातील रस्त्यांवर अवाढव्य खर्च होऊनही रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण का होत नाही? रस्त्यांची कामे करताना साहित्त्याची तपासणी केली जाते का नाही? केली जात असेल तर निकृष्ट मटेरीयल वापरून रस्ते का करू दिले जातात? रस्त्यांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी होत असताना प्रशासन ठेकेदारांवर कारवाई का करत नाही? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केले.