श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवार, दि. २६ एप्रिल रोजी आयोजित कोरोना एकल महिलांना शिलाई यंत्र वाटप करण्याचा कार्यक्रम बाजार समिती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, संयोजक गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार व आचारसंहिता सुरू असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व महसूलमंत्री विखे पाटील यांनी आपला श्रीरामपूर दौरा रद्द केल्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचे नव्याने नियोजन करण्यात येणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.