नगर व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांना जवळून जोडण्याच्या व श्रीरामपूर - वैजापूर या दोन्ही तालुक्यांची बाजारपेठेसह रस्त्यावरील ग्रामीण भाग विकसित होण्याच्या दृष्टीने आणि नगर - छ. संभाजीनगर रस्त्यावरील प्रवरासंगमच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या उदात्त हेतुने निर्माण करण्यात आलेल्या नगर - शिऊर या राज्यमार्ग 51 ची निर्मिती करण्यात आली. भूसंपादनाच्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तसेच शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने कोट्यावधीचा पुल होऊन देखील हा रस्ता अनेक वर्ष होऊ शकला नाही.मात्र दैनिक सार्वमतच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे काही अधिकारी तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यापुढील काळात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर नेहमीच खड्डे पडत राहिले तसेच वैजापूर भागातुन चालणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीमुळे या रस्त्यांचे तीन - तेरा वाजले.
श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत नुकतेच चार किलोमीटर कामासाठी शासनाच्या तिजोरीतून साडेपाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून या रस्त्यावर मुरमाऐवजी चक्क माती मिश्रित मुरूम टाकला जात असून गवळा खडीचा देखील वापर करण्यात येत आहे.यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी डोळे झाक करत असल्याने ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत असुन या रस्त्याची कॉलिटी कंट्रोल विभाग नाशिक कडून तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी रामपूरचे माजी सरपंच सुरेश भडांगे यांनी केले आहे.
वैजापूर तालुक्यातून श्रीरामपूर तसेच राहाता बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतमाल येत असतो तसेच याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रेलचेल सुरू असून या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. राजमार्ग असलेल्या या रस्त्याचे काम अशा ठेकेदारी पद्धतीने केल्यास हा रस्ता टिकणार का ? अशी शंका उपस्थित केली जात असुन कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नसुन या कामाची सखोल चौकशी होण्याची मागणी परिसरातील नागरिकातुन करण्यात येत आहे.