श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याची मागणी ; ग्रामपंचायतीत 'बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली' सुरु करा, अन्यथा 'इन्कलाब आंदोलन' छेडण्याचा राजेश बोरुडे यांचा इशारा


श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर तालुक्यात दीर्घ कालावधीपासून एकाच ग्रामपंचायतीत तळ ठोकून बसलेल्या ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करून सर्व ग्रामपंचायतीत 'बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली' सुरु करावी, अन्यथा 'इन्कलाब आंदोलन' छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदणाद्वारे दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक व वडाळा महादेव ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी व केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणीही राजेश बोरुडे यांनी केली आहे.

राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या दीर्घ कालावधीपासून प्रशासकीय बदल्या केलेल्या नाहीत. काही ग्रामपंचायतीत अनेक वर्षांपासून एकच ग्रामविकास अधिकारी प्रशासकीय कामकाज करत असल्यामुळे मनमानी कारभार करत आहेत. बहुसंख्य ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी वास्तव्य करत नाहीत. एक ग्रामसेवक दोन-दोन, तीन-तीन ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहे.  ग्रामसेवक ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतीत त्वरित 'बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली' सुरु करावी, अन्यथा 'इन्कलाब आंदोलन' छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.

बेलापूर बुद्रुक व वडाळा महादेव ग्रामपंचायतीत अनियमितता असल्याने माहिती दडवली...

तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हे ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित राहत नसून मनमानी कारभार करतात. ते टाकळीभान या गावी वास्तव्यास असून, त्यांना नेमून दिलेल्या बेलापूर बुद्रुक या मुख्यालयी राहत नाहीत. माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली असता माहिती देत नाहीत. अपील केल्यानंतरही माहिती दिली जात नाही. ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हे ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. वडाळा महादेव ग्रामपंचायतीने माहिती अधिकारात माहिती दिली नाही. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठी अनियमितता असल्यामुळे माहिती दडवून ठेवली जात आहे.

माहिती अधिकाराचे 'दर्शन' होताच घाबरले 'दर्शने' भाऊसाहेब...

वडाळा महादेव येथील ग्रामविकास अधिकारी प्रशांत दर्शने यांना माहिती अधिकार अर्ज परत पाठवतात. ते गावपुढाऱ्यांच्या तालावर नाचतात. माहिती अधिकार अर्ज स्वीकारत नाहीत. अपील सुनावणी झाल्यानंतरही माहिती देत नाहीत. वडाळा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने माहिती दिली जात नसल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.

बेलापूर व वडाळा महादेव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करावी...

बेलापूर बुद्रुक व वडाळा महादेव ग्रामपंचायती अंतर्गत कामांची, ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करावी. कर्तव्यात कसूर करणारे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व प्रशांत दर्शने यांची त्वरित बदली करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून वडाळा महादेव ग्रामपंचायतीत तळ ठोकून बसलेल्या ग्रामसेवक प्रशांत दर्शने यांची बदली करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post