श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर शहरात चौका-चौकात मटका, मन्ना, ऑनलाईन बिंगो, सोरट, गुटखा, गांजा, पत्त्याचे क्लब खुलेआम पणे सुरु असताना पोलीस प्रशासन करतंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात अवैध धंद्याविरोधात वारंवार उपोषणे होऊनही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही. शहरात सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात आज ( दि.१) लक्षणिक उपोषण करण्यात आले असून, पोलीस प्रशासनाने अवैध धंदे बंद केले नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी 'साईकिरण टाइम्स'शी बोलताना दिला. अवैध धंद्याविरुदच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत असून, विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला.
पोलीस प्रशासनाला यापूर्वी निवेदनही देण्यात आले होते. शहरामध्ये अनेक ठिकाणी ऑफीस टाकून ऑनलाईन बिंगो, मन्ना पत्ता, सोरट सुरु आहे. अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब खुलेआम सुरु आहे तर काही पत्त्याचे क्लब म्हाडा पोलीस कॉलनी रोडवर जेथे लोक वस्ती आहे अशा ठिकाणी अवैधरित्या सुरु आहे. संगमनेर रोड येथील रस्त्याच्या कडेला खुलेआम पणे ऑनलाईन बिंगो गेम चालू आहे. नॉर्दन ब्रँच दहाव्याचा ओटा रोड देखील खुलेआम टपऱ्या टाकून मटका, सोरट आदी अवैध धंदे सुरू आहे. अवैधरित्या अनेक ठिकाणी हातभट्टी दारू विक्री देखील सुरु आहे. राज्यामध्ये बंदी असलेल्या गोवंश यांची देखील हत्या करुन गो-मास विक्री देखील सुरु आहे. बोरावके कॉलेज रोड परिसरात अनेक ठिकाणी मटक्याच्या खुलेआम टपन्या सुरु आहे. गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.