विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे: संदीप मिटके


श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे.आज विद्यार्थीचे ध्येय दिवसाला दीड जीबी डाटा संपवणे बनलेले आहे.दीड जीबी डाटा रोज संपवणे आजच्या तरुण पिढीचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे का? असा सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला.न्यू इंग्लिश स्कूलचे महत्व विशद करताना त्यांनी हे ही सांगितले की आई ही मुलांची पहिली शाळा आहे,तर शाळा ही मुलांची पहिली आई असते.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असून यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक व आपल्या अभ्यासातील प्रगतीसाठी करावा.पोलीस दलातील माणसे हे परग्रहावरील नसून ती आपल्यातलीच आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यां व पालकांसमोर श्री मिटके यांनी व्यक्त केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मिटके,अविनाश कुदळे, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे, अनुजा टेकावडे, प्रतीक्षित टेकावडे, बाळासाहेब ओझा, विधिज्ञ दादासाहेब औताडे, संगीता कासलीवाल, अरुण पुंड, प्राचार्या जयश्री पोडघन, प्राचार्य डॉ योगेश पुंड आदींच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून हिरण जेठवा हिचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात २०१९ ते २०२१ पर्यंत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर ज्युनिअर के जी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व वाहवा मिळवली. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post