या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मीनाताई जगधने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उच्च गुणवत्ता व कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांना विविध खेळांविषयी अचूक मार्गदर्शन व पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध झाल्यास खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकतात. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सेवा सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. प्राचार्य मुकुंद पोंधे यांनी कठोर मेहनत घेतल्यास खेळामध्ये निश्चित यश मिळते. खेळातील आव्हानावर मात केल्यास तुम्ही जीवनाची स्पर्धा नक्कीच जिंकाल असा आशावाद व्यक्त केला. ऑलिंपिक सारख्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता कमी पडते आहे. त्यासाठी खेळाडूंनी प्रामाणिकपणे कष्ट केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाच्या क्षेत्रामध्ये भारताला नावलौकिक मिळवता येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्रा.सुभाष देशमुख यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब बावके, दिलीप घोडके उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विविध खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंच उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.बापूसाहेब घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. बाळासाहेब शेळके यांनी मानले. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.