अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे तालुकाध्यक्ष रंजन लोखंडे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल गोराणे, तालुका सचिव फिलिप पंडित, खजिनदार दादाभाई सय्यद, सहसचिव निर्मलाताई ओहळ यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी पत्रकार राजकुमार आसने, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या. जुलैमध्ये रिमझिम पावसावर पेरण्या झाल्या. पुन्हा ऑगस्टमध्ये ओढ बसली. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जवळपास रोजच पाऊस पडत होता. यामुळे तालुक्यातील मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तुर, कांदा यासह फुल शेती आणि फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. रोज होणाऱ्या पावसाची तसेच अतिवृष्टी झालेल्या मंडळांची नोंद तहसीलदार कार्यालयाकडे असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.