मेलबोर्नला विराटची रनत्रयोदशी - डॉ. अनिल पावशेकर

 


मेलबोर्नला विराटची रनत्रयोदशी
               - डॉ. अनिल पावशेकर

विराट पांड्या जोडीने सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे चा मुलमंत्र जपत आगेकूच केली. हळूहळू 'कत्ल की रात' जवळ येत होती आणि यावेळी दोघांनीही शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ चा मार्ग अवलंबला. बाबर सेनेचा तोफखाना क्रुर शाहिन आफ्रिदी आणि तेजतर्रार हॅरीफ रौफने सांभाळला होता. तर आपल्या संताजी धनाजी जोडीचा डोळा पाक आक्रमणातील कच्चा दुवा फिरकीपटू मोहम्मद नवाज वर होता. मात्र मो.नवाजची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता. आफ्रिदी,रौफ सारख्या मुळावर घाव घातले की मो.नवाज सारख्या फांद्या आपोआप खाली येणार हे दोघांनी ताडले आणि अब की बार विराट सरकारचा नारा मेलबोर्नच्या रणांगणावर घुमू लागला.

खरेतर शाहिन आफ्रिदी आज पुर्णपणे लयात नव्हता, त्यातच पांड्या विराट जोडीचा चांगलाच वार्मअप झाला होता.  अठरा चेंडूत अठ्ठेचाळीस धावांचे गणित येताच दोघांनीही टॉप गिअर टाकत आफ्रिदीचा धुव्वा उडवत पहिले ठाणे जिंकून भारताच्या कुडीत प्राण ओतले. एकोणिसावे षटक हॅरिस रौफच्या वाट्याला आले आणि इथेच भारताच्या कित्येक वर्षांच्या भळभळत्या जखमेवर कोहली विराटलेप लावणार होता. आठवा जावेद मियांदादचा चेतन शर्माला हाणलेला तो षटकार. चीन च्या भिंतीपेक्षाही मजबूत होत विराटने हॅरीसला दोन सणसणीत षटकार ठोकले. त्यातला पहिला अविश्वसनिय षटकार केवळ कोहली अथवा देवंच मारू शकतो. दुसरा षटकार तर वेटरला टीप द्यावी एवढ्या सहजतेने मारला होता.  या दोन्ही षटकारांच्या भुकंप लहरी थेट लाहौर ते इस्लामाबाद पर्यंत जाणवल्याच्या बातम्या आहेत.

भारतियांनी दोन्ही ठाणी काबीज करताच अंतिम पाडाव दृष्टीपथात आला होता. गोलंदाजांच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघ सिंहाच्या जोडीपुढे मो.नवाज नावाचे कोवळे सावज होते. मात्र हे सावज नसून सापळा होता. पांड्या अलगद या सापळ्यात अडकला आणि पुन्हा एकदा काळीज वरखाली होऊ लागले होते. हातातोंडाशी आलेला घास पाक हिसकावून तर घेणार नाही ना अशी भीती वाटत होती. मात्र विराटने स्ट्राईक घेताच नवाजच्या सापळ्याची शेळी झाली. पहिले षटकार आणि नोबॉल नंतर वाईड बॉल. नंतर फ्री हिटवर तीन धावा काढताच विजयश्री माळ घेऊन टीम इंडियाकडे येऊ लागली. मात्र कहानी में ट्वीस्ट अजूनही बाकी होते.

अनुभवी दिनेश कार्तिक ऐनवेळी गोंधळला आणि परत एकदा भारतीयांची धडधड वाढली. अखेर रविचंद्रन अश्विनने शांतचित्ताने मो.नवाजला चुक करण्यास भाग पाडले. एक चेंडू वाईड जाताच पाकचे अवसान गळाले. उरलीसुरली कसर पुर्ण करत अश्विनने पाकच्या जखमेवर मीठ चोळले. अद्भुत, अवर्णनीय असा विजय साकारत टीम इंडियाने देशवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. विराटच्या बॅटींग क्लासला पाककडे तोड नव्हता. शेवटचे षटक फिरकीपटूला देऊन बाबरने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. जर या सामन्याचा थोडक्यात सारांश लिहायचा झाला तर अर्शदिपसिंगचे दोन बळी आणि विराटचे दोन षटकार सर्वाकाही सांगून जाते. तरीपण विराटचे हॅरीसला मारलेले दोन षटकार पाहून 'दो ही मारा लेकिन सॉलीड मारा' असे म्हणावेसे वाटते. भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post