अहमदनगर : औरंगाबाद-अहमदनगर-पुणे या नियोजित 268 कि.मी. लांबीच्या सहापदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस महामार्गाच्या अहमदनगर जिल्हयातील कामांचा, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेतला.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर या महामार्गाच्या कामांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आ.संग्राम जगताप,आ.किशोर दराडे, आ.प्राजक्त तनपुरे, आ.मोनिका राजळे, आ. रोहित पवार, आ.लहू कानडे, आ. किरण लहामटे, आ.आशुतोष काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनित पाऊलबुध्दे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, उपायुक्त नियोजन प्रदिप पोतदार, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येणारे भूसंपादन, जिल्हयातून जाणाऱ्या महामार्गावरील गावांसाठी सर्व्हिस रोड करणे, जिल्हयातील प्रमुख रस्ते महामार्गाला जोडणे व अन्य कामांचा आढावा घेतला आणि महामार्ग प्राधिकरणाला सूचना केल्या. भविष्यातील गरजा ओळखून अहमदनगर शहराला या नियोजित महामार्गाला जोडण्याची सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली. तसेच बैठकीत जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा या आराखडयात समावेश करावा अशा सूचना पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या. महामार्ग प्राधिकरणाचे संचालक श्री.प्रफुल्ल दिवाण यांनी महामार्गाचा कामकाज आराखडा बैठकीत सादर केला. नियोजित महामार्ग राज्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई, पुणे-बेंगरुळू आणि समृदी महामार्गाला जोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली