राजेश बोरुडे यांनी केंद्रीय मंत्री श्री गिरीराज सिंह, ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे सचिव श्री.राज कुमार दिग्विजय, राज्यमंत्री साध्वी ज्योती, ग्रामीण विकास राज्यमंत्री श्री फग्गन सिंह कुलस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तक्रार केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दिघी या गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 128.15 लक्ष रक्कमेच्या अंदाजित खर्चाचे रा.मा.36 ते दिघी तालुका बॉर्डर रोड रस्त्याचे सध्या सुरु असलेले काम अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर करून चालू आहे. या रस्त्याच्या कामात सुरवातीपासूनच अतिशय निकृष्ट, कच्ची, ठिसूर खडी वापरण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता काही दिवसांतच खचून जागोजागी खड्डे पडणार आहेत. रस्त्याच्या कामात खाणीतील काळीशार, पक्की खडीचा वापर होणे आवश्यक असताना ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून निकृष्ट मटेरियलचा वापर केला असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्वत्र साईडगटार केली नसून साईड गटारीचे काम अर्धवट सोडले आहे. रस्त्याच्या मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याचे बोरुडे यांनी म्हटले आहे.
रस्त्याचे काम चालू असताना साईडवर पीएमजीएसवाय कार्यालय अहमदनगर यांचे नियुक्त अभियंता, अधिकारी यांनी तेथे उपस्थित राहून करारपत्रे, अति-शर्ती अंदाजपत्रकाप्रमाणे ठेकेदारकडून रस्त्याचे काम करून घेणे आवश्यक असताना संबंधित अभियंता तेथे उपस्थितच राहत नसल्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने निकृष्ट मटेरियलचा वापर करून रस्त्याचे दर्जाहीन काम करत आहे. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळेच ठेकेदाराला मोकळीक देऊन संगणमताने शासकीय निधीतून स्वतःचे घरे भरली जात असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केले.
तपासणीला कोणते मटेरियल दिले व प्रत्यक्षात कोणते वापरले याची चौकशी व्हावी...
रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी रस्त्याच्या कामात वापरल्या जाणाऱ्या मटेरियलची प्रयोगशाळेत तपासणी होणे सक्तीचे असताना रस्त्याच्या कामात खराब, दर्जाहीन मटेरियल कसे वापरले जात आहे? मटेरियलची तपासणी केली आहे का नाही? याची सखोल चौकशी करून जर, रस्त्याच्या कामात वापर होत असलेल्या मटेरियलची तपासणी केली असल्यास , तपासणीला ठेकेदाराने कोणते नमुने दिले व प्रत्यक्षात कोणते मटेरियल वापरले याची सखोल चौकशी करून यात दोषी आढळणारे संबंधित अधिकारी, रस्त्याच्या कामाचे पर्यवेक्षण करणारे अभियंता, राज्य गुणवत्ता निरीक्षक व रस्त्याचे काम करणारे कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या टाकावे व कामाचे देयके अदा करू नये, अशा अनेक मागण्या राजेश बोरुडे यांनी केल्या आहेत.