( संदिप जगताप, नाऊर )
श्रीरामपूर : वैजापूर या दोन्ही तालुक्याना जोडणारा मार्ग असलेला निमगांव खैरी ते नाऊर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असुन या रस्त्यावर मोठ - मोठी खड्डे पडले असुन यामुळे या भागातुन दैनदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह नोकरदार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां सह शहरातील रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णाना वेळेत रुग्णालयात पोहचवता येत नसुन या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अन्यथा भिम पँथर च्या वतीने आंदोलनाचा इशारा तालुकाध्यक्ष तनवीर शेख यांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनानुसार या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन निमगांव खैरी ते नाऊर पर्यंतच्या ११ कि .मी. अंतर जाण्यासाठी या रस्त्यात असणाऱ्या खड्डयामुळे तब्बल तासभराचा वेळ लागत असुन या रस्त्यावर कमरे इतके खड्डे झाले असुन संबधित विभाग मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या खड्डयामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले असुन अनेकांचे अपघात होत आहेत.
या रस्त्यावरून वैजापूर व श्रीरामपूरची दैनदिन मोठी वाहतुक सुरु असते. वैजापूरकडील अनेक शेतकरी आपला शेतमाल घेऊन श्रीरामपूर व राहाता बाजार समितीमध्ये याच मार्गावरून ये - जा करत असतात, या खड्डयातुन चालतांना शिव्यांची लाखोली देखील प्रशासनाला वाहत असतात. पावसाळ्यामध्ये गुडघ्याच्या वर खड्डयात पाणी साचल्याने वाहन चालकांना खडड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालक या पाण्यात पडून जखमी होत असुन कार चालकांच्या कार च्या चेसीज तुटल्या आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अमोल काळे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महासचिव राज खान, युवा जिल्हाध्यक्ष तन्वीर सय्यद, तालुकाध्यक्ष तनवीर शेख,अनिल गांगुर्डे यांनी दिला आहे.
रामाचा वनवास १४ वर्षाचा मात्र आमचा कायमचा ...!
श्रीरामपूर व वैजापूर हे दोन्ही शहरे एकमेकाना जवळून जोडण्यासाठी तसेच दोन्ही तालुक्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने महामार्ग ५१ ची निर्मिती करण्यात आली मात्र उंदिरगाव - नाऊर या रस्त्याचे देखील ४ कि.मी. काम अद्याप शिल्लक असुन या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडले आहेत. हा महामार्ग जुन्या नव्या सरकारच्या स्थगितीत अडकला आहे.शहराला जोडणारे फक्त दोनच मार्ग असुन या दोन्ही रस्त्याची अवस्था "आई भिक मागु देईना अन बाप खाऊन देईना" अशीच झाली असुन रामाला वनवास १४ वर्ष भोगावा लागला मात्र या परिसरातील नागरिकांना प्रभु श्रीरामाचे नाव असलेल्या शहरात जाण्यासाठी भारताचे अमृत महोत्सव साजरे करत असतांना अद्यापही रस्त्यांमुळे वनवास भोगावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांतुन व्यक्त केली जात आहे.