श्रीरामपूर : शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, अस्वछता, रस्त्यांवर जागोजागी असलेल्या खड्डयात साचलेले पाणी यामुळे डासांचा मोठा उद्रेक झाला असून शहरवासियांना थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू अशा साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने त्वरित प्रभावी डास व जंतू प्रतिबंधक फवारणी करावी आणि रस्त्यांवरील खड्डे योग्य पद्धतीने बुजवावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल गोराने, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके आदींनी केली आहे. यासंदर्भात पालिकेचे प्रशासक अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
झिरंगे नगर, गोराने वस्ती, स्वप्नपूर्ती, स्वप्ननगरी, लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी रस्ता परिसरासह शहरात सर्वत्रच डासांचा मोठा उद्रेक झाला असून, साथीच्या रोगांचे प्रमाणही वाढले आहे. कचरा नियमित साफ केला जात नाही व पूर्णपणे उचललाही जात नाही. घनकचरा ठेकेदार कामात दिरंगाई करत आहे. गटारीही तुंबल्या आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरवासियांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पालिका हद्दीतील नागरिकांना नागरी, आरोग्य सुविधा पुरविणे, ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. शहरात डासांचा उपद्रव थांविण्यासाठी त्वरित योग्य उपाययोजना करून, डास व जंतू प्रतिबंधक फवारणी करावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयात पाणी साचून डासांची वेगाने उत्पत्ती होत आहे. ठेकेदारांनी रस्त्यांची अत्यंत निकृष्ट कामे केल्यामुळेच रस्त्यांवर लागलीच जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले, रस्ते उखडले असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला.
मागील अनेक दिवसांपासून शहरात डास प्रतिबंधक फवारणीच झाली नसल्याचा आरोप विठ्ठल गोराने यांनी केला.