श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या नेतृत्वाखाली तब्ब्ल पाच दिवस भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन केले. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन केले. मात्र, कर्मचाऱ्यांना आडमुठे ठरवून आंदोलनाची हवा काढून घेण्याचा डाव पुरता चिखलात फसला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनीही आपल्या हक्कासाठी सुरु असलेला लढा चालूच ठेवल्याने अखेर पाचव्या दिवशी कारभाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपुढे झुकावे लागले. कर्मचाऱ्यांच्या काही अंशी मागण्या मान्य करण्यात आल्या.
कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करावी, प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करावी आदी मागण्यासाठी बेलापूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. त्यामुळे कामगारांना ९०० रुपये तसेच महागाई भत्ता २०० रुपये वेतनवाढ देण्याचा एकमताने निर्णय झाला. त्यामुळे कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.
कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कासाठी भर पावसात ५ दिवस धरणे आंदोलन करावे लागल्यामुळे बेलापूर ग्रामपंचायतीचा मोठी नाचक्की झाली. गावकऱ्यामध्येही कारभाऱ्यांविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला.