एकलहरे ग्रामपंचायतकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कारखाना प्रशासनाला वेळोवेळी लेखी स्वरूपात कळविले असून देखील कारखाना प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
काही दिवसांपूर्वी टिळकनगर कारखान्याकडून या रस्ताचे खड्डे बुजविण्याचे काम मुरूम टाकून केले गेले होते. मात्र टाकलेले मुरूम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून,त्यामध्ये मुरूम कमी माती जास्त असल्याने ऐन पावसाळ्यात दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून दुचाकी या रस्त्यावर घसरत आहे त्यामुळे मोठ्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावर पाऊस झाल्यावर तीन ते चार फूट खाली पाणी साचत आहे, सुमारे अर्धा किलोमीटर पर्यन्त हीच अवस्था असल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत होत असल्याने तिव्र संतापाच्या भावना व्यक्त होतांना दिसत आहे.
दरवर्षी पाऊस आल्यानंतर या ठिकाणी पाणी साचले जाते. तेथून गाडी काढणे नागरिकांना शक्य होत नाही. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.
या रस्त्यावरून कामगार वर्ग विशेषतः महिला कामगार वर्गासह ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शेती माल वाहतूक करणाऱ्या वर्गा सह अन्य प्रवासी वर्गाची मोठी वर्दळ असल्याने कारखाना प्रशासनाने तात्काळ यासंदर्भात दखल घ्यावी अशी मागणी सरपंच रिजवाना अनिस शेख, ग्रामपंचायत सदस्या नसीम खातून जहागीरदार, अनुसया इंगळे, कोकिळा अग्रवाल, निर्मला झिने, पूजा चौधरी, रावण भागा निकम, आशा अनिल कांबळे सह सरपंच पती अनिस शेख, माजी सरपंच संजय अग्रवाल, बबन झिने, रंगनाथ जाधव, देविदास चौधरी, गणेश उमाप सह आदी ग्रामस्थांनी केली आहे.