पूर्वग्रह दूर ठेवून महिलांनी कार्य करावे- डॉ वंदना मुरकुटे : उर्दू शाळेत आदर्श माता व नारी अभिमान पुरस्काराचे वितरण


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) : एखाद्या गोष्टीबाबत असलेला पूर्वग्रह बाजूला ठेवून कार्य केल्यास यशश्री हमखास प्राप्त होते. कुटुंब चालवताना महिलांनी घरातील कर्त्या पुरुषाला सुद्धा मानसन्मान देऊन आपले जीवन सफल करावे. माता पित्यांनी केलेले संस्कार हे भावी पिढीमध्ये रुजविण्यासाठी पालक म्हणून आपली भूमिका महत्त्वाची आहे. महिला दिवस साजरा करताना नवीन संकल्प घेऊन भावी पिढीसाठी योग्य असे जीवनानुभव देण्याचा प्रयत्न करू या असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सौ.वंदनाताई मुरकुटे यांनी केले.

येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये महिला दिनानिमित आयोजित केलेल्या आदर्श माता व नारी अभिमान पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेविका समीना अंजुम शेख या होत्या. डॉ. मुरकुटे पुढे म्हणाल्या कि माझं बालपण मालेगावात गेले आहे. आम्ही जिथे राहतो तेथे शेजारी सर्व मुस्लिम कुटुंबे आहेत. त्यांच्याशी आमचा चांगला घरोबा आहे. आमच्या मध्ये कधी ही मतभेद तिथं झाले नाहीत. मंदिर आणि मशीद शेजारी आहेत आणि दोन्ही समाजाचे लोक मिळून तेथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र काही लोक समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने फूट पाडतात. यापासून सुद्धा सर्वांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. इतर शाळांमध्ये दिसणाऱ्या उणिवा येथे दिसून आल्या नाही. शाळेचा शिक्षक वर्ग मुलांच्या प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर असल्याचे दिसून आले असे गौरवोद्गार काढून मुख्याध्यापक सलीमखान पठाण व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन ही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणामध्ये नगरसेविका समीना शेख यांनी शाळेने आदर्श माता पुरस्काराचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला आहे तसेच ज्या शिक्षक महिला भगिनींना पुरस्कार मिळाले त्या सर्वांचे अभिनंदन केले. या प्रसंगी महिला पालकांच्या वतीने बोलताना सौ तबस्सुम आसिफ अन्सारी यांनी इस्लाम धर्माने महिलांना अत्यंत मानाचे स्थान दिले असून ते सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे दरवर्षी आदर्श माता पुरस्कार देऊन महिला पालकांचा गौरव केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी दोन वर्षाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी शाळेत तर्फे आदर्श माता पुरस्कार देऊन शाळेच्या महिला पालक नाजेमा शाह, तबस्सुम अन्सारी, तरन्नुम जहागीरदार, निकहत शेख, अफसाना तांबोळी, समीरा चाऊस, सफिया शाह, शहनाज शेख ,नसरीन शहा, साजेदा शाह, रुकय्या पिंजारी, तरन्नुम शाह, शाहिन पठाण, तय्यबा कुरेशी, रुकय्या शाह साजिया शेख, समीना आतार, अनिसा शेख, आयशा शेख, अफसाना शेख आदींचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली महिला आघाडीच्या श्रीरामपूर शाखेतर्फे देखील नगरपालिका शाळातील एकवीस महिला भगिनींचा नारी अभिमान पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला.


कार्यक्रमास मुख्याध्यापिका परवीन शेख, कांचन मुसळे, यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनाज शेख, सूत्रसंचालन शाहीन शेख यांनी केले तर आभार बशीरा पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, अस्मा पटेल,निलोफर शेख, मोहम्मद आसिफ, मिनाज शेख, एजाज चौधरी, यास्मिन शेख,उजमा पिरजादे, जुनेद काकर आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे यांनी शाळेच्या संगणक प्रयोग शाळेची पाहणी करून तेथील सुविधा पाहून शाळेने केलेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले.पालिकेची शाळा असूनही एवढी अत्याधुनिक सुविधा पूर्ण संगणक प्रयोगशाळा निर्माण केल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद दिले .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post