साईकिरण टाइम्स | ८ फेब्रुवारी २०२१
बेलापूर । प्रतिनिधी | देशातील काही राज्यात तसेच महाराष्टातील काही जिल्हयात 'बर्ड फ्लू'चा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे चिकनची मागणी घटली. मात्र, 'बर्ड फ्लू'च्या संसर्गामुळे मटणाची मागणी वाढली आहे. असे असतानाच गावात शेळ्या चोरीच्या घटना घडत असल्याचेही समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातून शेळ्या चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यत आठ शेळ्या चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
याप्रकरणी विजय शेलार, सिराज कुरेशी, निसार सय्यद, नवाब शेख, फराण शेख यांनी शेळ्या चोरी बाबत बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे. सदर तक्रारीत शेलार यांनी म्हटले आहे की, कुणीतरी अज्ञात ईसम राखाडी रंगाच्या चार चाकी ईंडीका गाडीत शेळ्या चोरण्याचे उद्योग करीत असल्याची दाट शक्यता असुन चोरलेल्या शेळ्या या लगेच कापण्यासाठी दिल्या जात असल्याचा संशय आहे. २७ जानेवारी रोजी गावातून एकाच वेळी सहा शेळ्या चोरीस गेल्या. त्या नंतर ४ फेब्रुवारी रोजी आणखी दोन शेळ्या चोरीस गेलेल्या आहेत. पोलीसांनी गावातील सीसीटिव्ही फुटेज तपासले तरी चोर सापडण्यास मदत होईल. पोलीसांनी शेळ्या चोर शोधुन त्याचेवर कारवाई करावी, अशी मागणी शेलार, कुरेशी, सय्यद, शेख आदि शेळी पालकांनी केली आहे.