साईकिरण टाइम्स | १ फेब्रुवारी २०२१
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्त्यावर असलेल्या चिंच फळ झाडांचा लिलाव हा चुकीच्या पध्दतीने झाला असुन, या फळ झाडांचा फेरलिलाव करण्यात यावा, अशी मागणी बेलापूर येथील व्यापार्यांनी केली आहे.
याबाबत सर्व संबधीतांना पाठविलेल्या निवेदनात व्यापार्यांनी पुढे म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्त्यावर असणाऱ्या चिंच फळांचा लिलाव हा गुपचुप उरकण्यात आला. आपल्या मर्जीतील व्यापाऱ्यांना हा लिलाव देण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी हा लिलाव ९० हजार रुपयांना गेला होता. यंदा हा गुपचुप लिलाव केवळ ४० हजार रुपयांना देण्यात आलेला आहे. मात्र, मागील वर्षापेक्षा बऱ्याच कमी रकमेने हा ठेका गुपचुप करण्यात आला. यात शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांने हा लिलाव केवळ कागदी घोडे नाचवुन, जाहीर लिलाव न करता व्यापाऱ्याशी हात मिळवणी करुन उरकुन घेतला आहे. त्यामुळे आता सर्व व्यापार्यांना बोलावुन फेर लिलाव करण्यात यावा, अशी मागणी मुनीर बागवान, निसार बागवान, नदीम बागवान, कैय्युम बागवान, शाकीर बागवान, नोविद बागवान, कासम बागवान, जुबेर बागवान, रफीक बागवान, हमीद आतार, रीयाज आतार आदिंनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री, प्रांताधिकारी, तहसीलदार, खासदार, आमदार यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.