साईकिरण टाइम्स | १८ जानेवारी २०२१
बेलापूर (प्रतिनिधी) ज्या दिवट्याला नऊ महीने पोटात वाढविले. पित्याने लहानचा मोठा केला. त्यानेच घरातुन हाकलुन दिले. अशा माता-पित्याचे पालनकर्ता हे सुभाष वाघुंडे झाले असून, पदरमोड करुन चालवलेल्या या वृध्दाश्रमास नागरीकांनी मदत करावी, असे आवाहन जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी केले.
श्रीरामपूर येथील गुरु माऊली वृध्दाश्रमास सहकार्य करण्यासाठी बेलापुर गावातील काही समाजसेवक गेले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना देसाई म्हणाले की, आई सारखे दुसरे दैवत नाही असे आपण म्हणतो. अन आपल्या मात्या-पित्यांना घराबाहेर हाकलतो. अन गुरु माऊली वृध्दाश्रमाच्या माध्यमातून सुभाष वाघुंडे सारखा देव माणूस केवळ माणूसकीच्या भावनेतुन त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतो. जिथे मुलांना आई वडील नकोसे झालेले असताना वाघुंडे सारखा देव माणूस कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांची सेवा शुश्रुषा करतो. अशा माणसाच्या पाठीशी समाजानेही खंबीरपणे ऊभे राहण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले.
यावेळी बोलताना भाऊसाहेब वाघमारे म्हणाले, तुमच्या खऱ्या नात्याने तुम्हाला ठोकरले. परंतु, नविन माणूसकीच्या नात्याने तुम्हाला तारले. आता वाघुंडे हेच तुमचे सर्व काही आहे. गत काळातील वाईट आठवणी मनात आणून दुःखी होवु नका. यावेळी सामाजिक कार्येकर्ते अकबर सय्यद म्हणाले, चांगले काम करणारे वाघुंडे यांच्या सेवा कार्यात थोडासा सहभाग घेता आला. याचा आनंद वाटतो गुरु माऊली वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले.