कार्यारंभ आदेश निघून अडीच वर्ष उलटले तरीही ठेकेदाराने रस्त्याचे काम केले नाही; नगरपालिका प्रशासन ठेकेदारावर कारवाई करणार का पाठीशी घालणार...!


साईकिरण टाइम्स | १८ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मधील 'विजय गोरे ते साबळे दुकानापर्यंत तसेच नाना पाटील यांचे घरापासून ते कर्डीले यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे' या कामाचे कार्यारंभ आदेश निघून तब्बल अडीच वर्ष उलटूनही  जुनेद शेख नामक ठेकेदाराने रस्त्याचे काम केले नाही. नगरपालिका प्रशासन ठेकेदारास पाठीशी घालत आहे. रस्त्याचे काम न करणाऱ्या ठेकेदारावर पालिका प्रशासन  कारवाई करणार का पाठीशी घालणार! दरम्यान, या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे  केली आहे. 

शहरातील पटेल हायस्कुल परिसरातील नगरपालिकेचा मंजूर असलेला हा रस्ता कामाच्या प्रतीक्षेत आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असल्याची टीका नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रभाग क्रमांक १६ मधील विजय गोरे ते साबळे दुकानापर्यंत तसेच नाना पाटील यांचे घरापासून ते कर्डीले यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सदर कामाची निविदा जुनेद कलीम शेख या ठेकेदारास मंजूर झालेली आहे. संबंधित ठेकेदाराने सहा महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही अडीच वर्षे उलटूनही संबंधित ठेकेदाराने काम केले तर नाहीच. उलट नगरपालिका प्रशासनानेही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे स्नेहल खोरे यांनी म्हटले आहे.

शहरातील विकासकामांची गती मंदावली आहे. रस्ता मंजूर असतानाही अडीच वर्षांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने हे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून नागरिकांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर प्रभागाच्या नगरसेविका स्नेहल केतन खोरे, ज्येष्ठ नागरिक नाना पाटील, शरद बोरावके, सखाराम कर्डीले, विष्णू तागड, प्रीतम पासवान, आबासाहेब काळे, अशोक मांडगे, विश्वनाथ गाढे, राजू सातपुते, शिरीष गवळी, शेजुळ साहेब, उमेश वांढेकर, दत्तात्रय भांबुरे, गोरे साहेब, अंभोरे साहेब, गोसावी साहेब, श्रीमती निर्मळ, साबळे साहेब, जोशी साहेब, सुधाकर पाटील, व्ही.टी. पाटील, घुले साहेब, वैभव गवळी यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.

 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post