साईकिरण टाइम्स | ११ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता संवैधानिक कायदा करून मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात यावे. मुस्लीम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे व चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला देण्याची मागणी, मुस्लिम आरक्षण निर्णयाक आंदोलन या संघटनतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. या आशयाचे निवेदन श्रीरामपूरातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिले.
सर्व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला सोडाव्यात. मुस्लिमांवर होणारे हल्ले मॉब्लिचिंग सारख्या गंभीर घटना यांना आळा घालण्यासाठी मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन या संघटनतर्फे काल राज्यभरातील तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना एकाच वेळी राज्यभर निवेदने देण्यात आली. श्रीरामपूरात देखील या निर्णयानुसार निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी उम्मती फाऊंडेशनचे सोहेल दारूवाला, रईस जागीरदार, नगरसेवक मुक्तार शहा, जे जे फाऊंडेशनचे जोएफ जमादार, उर्दू साहित्य परिषदेचे सलीमखान पठाण, साजिद मिर्झा, रियाज पठाण, यासीनभाई सय्यद, ॲड. आरिफ शेख, फिरोज पठाण, अकबर शेख, अहमद शाह, शाहरुख शेख,मोसिन शाह, रिजवान शेख आदींनी सदरचे निवेदन हे तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिपक गोवर्धने व प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत दुर्गे यांना देण्यात आले. यावेळी पोलिस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.