अपंग दिनानिमित्त विशेष नैमित्तिक रजा मंजूर


साईकिरण टाइम्स | २८ नोव्हेंबर २०२०

श्रीरामपूर (प्रतिनिधी) तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व केडर मधील अपंग अधिकारी-कर्मचारी, शिक्षक यांच्यासाठी जिल्हा परिषदेने एक ते पाच डिसेंबर पर्यंत पाच दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली असून सर्व दिव्यांग बांधवांनी या नैमित्तिक रजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी केले आहे.

दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांना शैक्षणिक चर्चासत्र, कार्यशाळा व अपंग दिनाच्या कार्यक्रमासाठी ही रजा मंजूर केली जाते. संघटनेच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही रजा मंजूर केली असून जिल्ह्यातील सर्व विभागामधील दिव्यांग कर्मचारी-अधिकारी शिक्षक यांना या रजेचा लाभ घेता येईल. ही विशेष रजा असून या रजेतून किरकोळ रजा किंवा दीर्घ आजारपणाची रजा कमी होणार नाही. तरी या ऑनड्युटी चा सर्व दिव्यांग बंधू-भगिनीनी लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

जिल्हा अपंग संघटनेने आतापर्यंत जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना मागील चार वर्षाचा वाहन भत्ता दीड कोटी रुपये फरकासह मंजूर केला असून जिल्ह्यातील 185 लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील दिव्यांग  शिक्षकांमधून 37 जणांना मुख्याध्यापक व तीन जणांना शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.एवढ्या मोठ्या संख्येने  अपंगांना पदोन्नती मिळवून देणारी अहमदनगर जिल्हा शाखा एकमेव आहे असे ही अनाप यांनी सांगितले. संघटनेतर्फे दरवर्षी दिव्यांग भूषण पुरस्कार देऊन अपंग दिनी गौरविले जाते. यावर्षी सुद्धा कार्यक्रमाला परवानगी मिळाल्यास संघटनेतर्फे दिव्यांग गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भगिनींनी आतापर्यंत संघटनेला मोलाची साथ दिली आहे. त्यामुळेच अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावणे शक्य झाल्याचे ही ते म्हणाले. 

अपंग दिनानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या विशेष नैमित्तीक रजेचा लाभ घेण्याबरोबरच संघटनेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात देखील जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वश्री.जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप, मार्गदर्शक दत्तात्रय जपे, सचिव पोपट धामणे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, कोषाध्यक्ष विजय औटी, तालुकाध्यक्ष दादासाहेब गव्हाणे, उद्धव थोरात, भाऊराव नागरे, के के बाचकर, अनिल घोलप, प्रेमनाथ डोंगरे, भारत तोडमल, राजेन्द्र ठुबे, किरण माने, महेश भागवत, संजय हरकल, संतोष सरवदे, साहेबराव मले, महबूब शेख, रमेश शिंदे आदींनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post