साईकिरण टाइम्स | २६ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर ( अहमदनगर ) केंद्रीय कामगार संघटना व विविध २५० शेतकरी संघटना यांच्या वतीने, केंद्र सरकारच्या कामगार-शेतकरी आणि जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ (संलग्न एक्टू) च्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतमजूर, हॉस्पिटल कर्मचारी, हमाल मापाडी, औद्योगिक कामगार आदींनी मोर्चात सहभाग घेतला. मोदी सरकारच्या कामगार-शेतकरी विरोधी धोरणाचा जोरदार निषेध करीत विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहचल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे राज्य अध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे म्हणाले की, कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून सर्वाना२१ हजार रुपये किमान वेतन मिळायला हवे, त्यातही शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील कंत्राटी व मानधनी कर्मचार्याना कायम स्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे. सर्वाना सेवानिवृत्ती वेतन आणि सामाजिक सुरक्षा दयावी, कामगार विरोधी चार श्रम संहिता व शेतकरी विरोधी कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत. अन्यथा भविष्यात मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात कामगार वश्रमिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. लाल निशाण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कॉ. राजेद्र बावके म्हणाले की,गेल्या सहा वर्षात मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगारांचे शोषण वाढून शेतकरी देशोधडीला लागले आहेत. तसेच विविध सरकारी उद्योग, शेती देशी विदेशी कंपन्याच्या खिशात घालण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या विरोधात कामगार–शेतकरी व कष्टकरी जनतेने एकत्र येऊन मोदी सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.
यावेळी कॉ. जीवन सुरुडे, नर्सिंग युनियनचे मनोज बारसे, हमाल पंचायतचे आनंद साळवे, इंदुबाई दुशिंग यांची भाषणे झाली. सूत्र संचालन कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी तर मोर्चाचा समारोप भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून कॉ. धनंजय कानगुडे यांनी केला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. राजेद्र बावके, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, कॉ. फैय्याज इनामदार, कॉ. धनंजय कानगुडे, राहुल दाभाडे, प्रकाश भांड, उत्तम माळी, रामा काकडे, संतोष केदारे, विष्णू थोरात, शोभा विसपुते, ज्योती लबडे, अनिता परदेशी, निर्मला चांदेकर, सुनील शेळके, दिनकर घुले, विठ्ठल चौधरी, नदीम पठाण, अनिल गायकवाड, प्रकाश त्रिभुवन आदींनी प्रयत्न केले.