साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 ऑगस्ट 2020
राहुरी (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील सुरेश आघाव व कुटुंबियांनी जमीन दान करून मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लावत भव्य-दिव्य सोमनाथ महाराज मंदिर उभारले आहे. या मंदिरातील मूर्तिची प्राणप्रतिष्ठा रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
मुळा धरण परिसरातीळ वंजारवाडी भागात सन १९६८ पूर्वी सोमनाथ महाराज यांनी जिवंत समाधी घेतली होती. त्यावेळी आघाव कुटुंबाचे पूर्वज धरण परिसरतील वंजारवाडी येथे वास्तव्यास होते व त्यांनी सोमनाथ महाराज यांची शिळारुपी मूर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. मुळा धरण झाल्यानंतर व सर्व जमिनी आणि घरे पाण्याखाली गेल्यानंतर आघाव कुटुंब वाघाचा आघाडा परिसर भागात वास्तव्यास आले परंतु सोमनाथ महाराज यांची शिळा मात्र त्याच ठिकाणी पाण्याखाली राहिल्याने त्यांच्या कुटुंबातील पूर्वजांच्या स्वप्नात सोमनाथ महाराज येऊन तुम्ही मला सोडून गेले, मला घेऊन चला असा दृष्टान्त दिला असे सांगितले जाते. त्यानंतर मूळा धरणाच्या खोल पाण्यातून काढून वाघाचा आघाडा येथील आघाव वस्ती येथे सोमनाथ महाराज यांची शिळा एका छोट्याश्या मंदिरात बसविण्यात आली. याचठिकाणी श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते व यात्रेसाठी बीड आणि नगर बरोबरच बाहेरच्या जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे स्वीय सहायक असलेले सुरेश आघाव यांनी भव्यदिव्य स्वरूपाचे मंदिर बांधण्याची संकल्पना मांडली व नुसती संकल्पना मांडूनच थांबले नाही तर ती साकारण्यासाठी आपली स्वतःची १० गुंठे जागा दान करून या कार्यात अग्रेसर भूमिका घेतली. त्यांच्या या चांगल्या धार्मिक कार्यास सीताराम आघाव, गीताराम आघाव, तुकाराम आघाव, अंजाबापू आघाव, विठ्ठल आघाव, दिलीप आघाव, अशोक जाधव(पारनेर), विजय राठोड, गौखेल जिल्हा बीड येथील गावकरी, वाघाचा आखाडा, तांदुळवाडी पंचक्रोशितील भाविकांनी मदतीचा हात दिला. सुरेश आघाव व कुटुंबियानी मंदिराच्या सुरुवातीच्या कामाला खूप सारी रक्कम खर्च करून मंदिर कामाचा श्रीगणेशा केला. बँकेचे सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज मंदिर कामासाठी घेण्यात आले असून मंदिराच्या कामासाठी कर्ज ही संकल्पना प्रथमच राबविली गेली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
आघाव कुटुंबीयांच्या भरीव मदतीने अवघ्या काही वर्षाच्या कालावधीत सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून वाघाचा आखाडा व तांदुळवाडी भागाच्या वैभवात भर घालणारे मंदिर दिमाखात उभे राहिले आहे. या कामी अभियंता संजय पवार, राजकुमार सावंत यांनी मानधन न घेता ही सेवा अर्पण केली आहे. १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत सोमनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजा नगर येथील पौरोहित्य श्रीपाद राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग, सॅनेटायझर , मास्क आधी गोष्टीचा वापर केला जात आहे. १६ ऑगस्ट रोजी तारकेशवर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश आघाव यांनी केले आहे.