साईकिरण टाइम्स ब्युरो, 14 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करणारे शहर म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेची ओळख होती; मात्र, सध्याच्या नगराध्यक्षाना काहीच समजत नसल्याने पाणी पुरवठा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. श्रीरामपूरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील जनतेला घाण वास व चव असलेले पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे असतांनाच साठवण तलावात काल पुन्हा एकदा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे शहरातील जनतेच्या मनात भीती निर्माण झाली असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा साठवण तलावात मृतदेह सापडल्याची भयानक घटना घडली आहे, तरसुद्धा पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. याबाबत गेल्या अनेक पालिकेच्या सभेत तलावाच्या सुरक्षतेच्या बाबतीत चर्चा झाली. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलेही कार्यवाही झाली नाही याऊलट पालिकेचा साठवण तलाव हा गाया, म्हशींचा गोठा झाला आहे शेजारी राहणारे लोकं त्यांची जनावरे तळ्यात बांधत आहे त्याकडे पालिका प्रशासन डोळे झाक करत आहे.
सत्तेत येऊन जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटला असून तरी देखील नगराध्यक्षाना आपली जबाबदारी समजली नाही. कुठलेही विकासाचे धोरण नाही फक्त आणि फक्त सूडबुद्धीचे राजकारण हा एकमेव हेतूने सत्ताधारी काम करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
गेल्या पंचवीस वर्षात स्व.जयंतराव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामा बरोबरच श्रीरामपूर नगरपरिषदेने भव्य साठवण तलावाची निर्मिती करुन श्रीरामपूरच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. सध्याच्या सत्ताधार्यांना सगळं आयते असून सुद्धा ते सांभाळत येत नाही. नगराध्यक्षा या श्रीरामपूरचे पाणी पित नसल्याने कदाचित त्यांना पाण्याची चव बदल्याचे समजले नसल्याचा टोला ही नगरसेवकांनी लगावला आहे.