साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | शासनाने जनतेला ग्रामपंचायत कामकाजाविषयी माहिती तात्काळ व विनाविलंब उपलबद्ध व्हावी तसेच ग्रामपंचायत कारभारामध्ये पारदर्शकता असावी या करिता http://www.planningonline.gov.in/ हि वेबसाईट जनतेसाठी उपलब्द्ध करून दिलेली आहे. निपाणी वडगाव ग्रामपंचायतीमार्फत या वेबसाईटवर पूर्णपणे माहिती भरली जात नाही व त्यामुळे जनतेला आवश्यक असलेली माहिती उपलब्द्ध होत नाही. ऑनलाईन माहिती पूर्णपणे न भरणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी निपाणी वडगाव येथील श्री. संतोष प्रभाकर गायधने यांनी केली आहे.
हेही वाचा : अखेर पोलीस चौकीचा तिढा संपला....
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने http://www.planningonline.gov.in/ या वेबसाईट वर भरलेल्या माहितीचे अवलोकन केले असता असे लक्षात येते कि श्रीरामपूर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीमार्फत सदर वेबसाईटवर खरी माहिती भरली जात नाही केवळ रेकॉर्डला दिसण्यासाठी जुजबी स्वरूपाची माहिती भरली जाते. त्यामुळे शासनाची व जनतेची फसवणूक होत आल्याचा आरोप श्री. गायधने यांनी केला आहे.
तक्रारदार यांनी श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील ग्रामपंचायतीचे http://www.planningonline.gov.in/ या वेबसाईट वरून घेतलेल्या कॅशबुक ची प्रत आपल्या तक्रार अर्जासोबत जोडलेली आहे त्यानुसार रोख स्वरूपात झालेल्या कोणत्याही व्यवहाराची माहिती ग्रामपंचायतीने भरलेली नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ग्रामसेवक निपाणी वडगाव यांनी मूळ कॅश बुक प्रमाणे तंतोतंत माहिती सदरच्या वेबसाईटवर भरणे आवश्यक असताना शासनाची व जनतेची फसवणूक केलेली आहे.
ग्रामसेवकानी ऑनलाईन माहिती व्यवस्थित भरलेली आहे अथवा नाही हे तपासण्याची जबाबदारी हि पंचायत समिती व जिल्हा परिषद येथील वरिष्ठ अधिकारी यांची आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारीदेखील ग्रामसेवकाच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे कॅशबुक मधील एंट्री ह्या ऑनलाईन मध्ये बरोबर केलेल्या आहेत अथवा नाही याची खात्री न करता ऑनलाईन कॅशबुक क्लोज करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद मधील वरिष्ठ अधिकारी हे ग्रामसेवकांबरोबर आर्थिक व्यवहार करून जाणूनबुजून ग्रामसेवकाच्या चुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निपाणी वडगाव येथील ग्रामसेवकाबरोबरच श्रीरामपूर तालुक्यातील इतर काही गावातील ग्रामसेवकांनी देखील खरी ऑनलाईन माहिती भरलेली नाही त्यामुळे अशा सर्व ग्रामसेवकांवर व त्या ग्रामसेवकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांचेवर कारवाई करण्नयाची मागणी केलेली आहे तसेच दोषींवर कारवाई न केल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांना दिलेल्या पत्रात दिलेला आहे.