साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जुलै 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील उम्मती सोशल वेल्फेअर सोसायटी व श्रीरामपूर तहसील कार्यालयातर्फे कोरोना रोगाच्या जनजागृती बाबत रॅलीचे आयोजन करण्यात आले.
वार्ड नंबर 2 मध्ये काजीबाबा रोड येथून प्रांत अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंत जमदाडे, डॉ. तोफिक शेख, शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली, ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला आदिंच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
शहर काझी मौलाना सय्यद अकबरअली व जेष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी रॅलीच्या मार्गावर ठिक ठिकाणी नागरिकांना कोरोना महामारी तसेच त्यासाठी श्रीरामपूर तहसील कार्यालयाने केलेल्या उपाययोजना, प्रशासनाकडून उचलली जाणारी पावले, नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वार्ड नंबर 2 मध्ये हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेची संख्या मोठी असून या भागातील प्रतिबंधित क्षेत्र लवकरात लवकर संपविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या कामी भागातील जनतेने सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे, मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन केले. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी उम्मती सोशल वेल्फेअर सोसायटीच्या कामाचे कौतुक करून सामाजिक क्षेत्रात ही संघटना नेहमी आघाडीवर असते . कोरोना रोगाच्या निर्मूलनासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंत जमदाडे यांनी वैद्यकीय यंत्रणा 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून असून काही ही त्रास जाणवल्यास ग्रामीण रुग्णालय किंवा नगरपालिका रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. काजीबाबा रोड, सुलतान नगर चौक, जमात खाना चौक, नूरबी चौक, बागवान गल्ली आदी ठिकाणी कोरोना जनजागृतीचे महत्व विषद करण्यात आले.
सदरची रॅली यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सांगळे, प्रसन्ना धुमाळ, रिजवान मामे तसेच उम्मती सोशल वेल्फेअर सोसायटीचे सोहेल बारूदवाला, डॉ.तोफिक शेख, जुनेद शेख, अलीम बागवान, आदिल शेख, फिरोज पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सोहेल बारूदवाला यांनी आभार मानले.