साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले)
होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी ||
या अभंगाच्या ओळी प्रमाणे दरवर्षी आषाढी विठुरायाच्या वारीची ओढ ही लाखो वारकऱ्यांना असते. परंतु या कोरोना या महामारी मुळे चालू वर्षी आषाढी वारीवर मोठे संकट पडलेले दिसत आहे.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जगदंबा श्री घोडेश्वरी मातेचा पायी दिंडी सोहळा हा देवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वीस वर्षापासून ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पंढरीनाथाच्या दर्शनासाठी वारकरी गुण्यागोविंदान श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान करत असतो परंतु यावर्षी राज्य वर आलेले कोरोना(कोविड 19) या रोगामुळे हा पायी दिंडी सोहळा रद्द करत असल्याचे ह.भ.प.नामदेव महाराज कोरडे यांनी सांगितले. हा पायी दिंडी सोहळा रद्द होत असल्याने तब्बल वीस वर्षाची परंपरा खंडित झाल्याचे ह भ प कोरडे महाराज यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशातच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत श्री घोडेश्वरी मातेचा पायी दिंडी सोहळा हा चालू वर्षी स्थगित करत आहोत अशी माहिती ह.भ.प.नामदेव महाराज कोरडे यांनी दिली आहे.