साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 जून 2020
उक्कलगाव |प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्यास यावर्षी खंड पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आल्याची, माहिती ह.भ. प.बाबा महाराज ससाणे यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिंडी सोहळे यावर्षी काढू नयेत अशा सुचना प्रशासनाकडून केल्या आहेत. तीर्थक्षेत्र हरिहर केशव गोविंद महाराजांची उक्कलगाव येथून दरवर्षी पायी दिंडी सोहळा पंढरपूर येथे जात असतो. दिंडी सोहळ्याला सुमारे पाच वर्षे पूर्ण होउन यावर्षीच्या दिंडी सोहळ्याला सहाव्या वर्षात पदार्पण होणार होते. तीर्थक्षेत्र उक्कलगाव येथून दिंडी सोहळा योगिनी एकादशीला प्रस्थान होणार होती. दिंडी सोहळयाच्या निमित्ताने गावातीलच प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून पायी दिंडी सोहळा स्थगित करण्यात आला आहे. मात्र, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासन व प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्सव, सण, मेळावे तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कारणाने यावर्षी तीर्थक्षेत्र उक्कलगाव ते पंढरपूर हा पायी दिंडी पालखी सोहळा स्थगित करण्यात आला आहे.