साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 जून 2020
बेलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेलापूरच्या मुख्य चौकात असणाऱ्या पुतळ्या भोवती, नविन संरक्षक कठडे बसविण्यासाठी जुने सरंक्षण कठडे तोडून सहा महीने झाले ; परंतु ई निविदा न झाल्यामुळे अजुनही त्या कामास सुरुवात झाली नाही. याबाबत ग्रामपंचायतीस जाब विचारण्याची वेळ आली आहे.
बेलापूरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असुन या पुतळ्यास संरक्षक कठडे बसविण्यात आले होते ; परंतु ग्रामपंचायतीने ते कठडे नविन बसविण्याच्या नावाखाली जानेवारी महीन्यात तोडले. त्या ठिकाणी नविन कठडे बसविण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय एकदम घाईत घेण्यात आला. नविन संरक्षक कठडे, त्याचा नकाशा, त्यासाठी लागणारा निधी, काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी या बाबींचा गांभीर्याने विचार न करता पुतळ्या भोवती असलेले संरक्षक कठडे तोडण्यात आले.
त्यांनतर काही शिवप्रेमींनी सरपंच, उपसरपंच यांना या कामाबाबत सांगितले. अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनीही फेब्रुवारी महीन्यात ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले. त्या वेळेसे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी, ई निविदा झाली नसुन या कामा करीता निधी राखीव असल्याचे सांगितले होते. या नंतर कामास सुरुवात करण्यात आल्याचे भासविण्यात आले.अन निधी अभावी ते काम अर्धवटच सोडून देण्यात आले. या ठिकाणाहून दररोज शेकडो जबाबदार नागरीक जातात ;परंतु कुणीही या बाबत ग्रामपंचायतीला साधा जाब विचारला नाही. गावात अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली कामे चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवतीचे संरक्षक कठडे तातडीने पूर्ण होणे आवश्यक होते ; परंतु, या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर पंचायतीकडे निधीच नव्हता तर ते कठडे का तोडले ? यास जबाबदार कोण ? जुने कठडे कुणाच्या परवानगीने तोडले ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. ते तोडताना वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी आणून काम तातडीने पूर्ण करु, अशी ग्वाही ग्रामस्थांना देण्यात आली होती. मग आता घोडे नेमके अडले कोठे? दुर्दैवाने काही घटना घडल्यास एखादे जनावर तेथे घुसल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा सवाल शिवप्रेमी नागरीकाकडून विचारला जात आहे.