साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 मे 2020
बेलापूर (प्रतिनिधी) बेलापूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून पंचायतीचा अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आला असल्याचा घणाघाती आरोप, भाजपाचे बेलापूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसार माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात श्री डावरे यांनी पुढे म्हटले आहे की , जनता आघाडी व विकास आघाडी यांच्यात आडीज आडीज वर्षासाठी स्थापन झालेल्या सत्तेच्या फॉर्म्यूल्या नुसार पंचायतीत सध्या सत्तेत असलेल्या विकास आघाडीची सत्ता असून अनेक गैर प्रकार घडत आहेत. पन्नास हजाराच्या पुढची खरेदी इ - टेंडरद्वारे करावी असा शासकीय नियम असताना तीन लाख रूपये किमतीच्या अंगणवाड्यांच्या खेळण्यांची खरेदी कोटेशनद्वारे करण्यात आली आहे.गावात एकून एकोणावीस अंगणवाड्या असताना , सदर साहित्य सहा अंगणवाड्यांनाच देण्यात आले ? इतर अंगणवाड्यांत मुले नाहीत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या cctv चे बिल दोनदा काढण्यात आले असून ही बाब इतर सदस्यांना माहीत नसल्याचे मासिक बैठकीतून समोर आले. सदर खरेदी कोणी केली ? याचा खुलासा विकास आघाडीच्या नेत्यांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून खरेदी केलेला संगणक कार्यालयात न ठेवता गावपुढाऱ्याच्या घरात ठेवला .त्याची कुजबूज काही सदस्यांना लागताच संगणक रातोरात पुन्हा कार्यालयात कसा आला ? त्याचप्रमाणे लॉकडाऊन असताना घाईघाईत निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय पंधरा टक्के निधीपासून अनेक लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे. पाच टक्के अपंग निधीचा लाभ अपंगांना न देता बारा ते पंधरा अपंगेतर व्यक्तींच्या नावे बोगस चेक काढून अनुदान लाटण्यात आले असून पंधरा ते वीस मयत व्यक्तींच्या नावावर बोगस अनुदानाचे चेक वटवले गेल्याचा गंभीर आरोपही श्री डावरे यांनी केला आहे .
या सर्व अनागोंदी कारभाराच्या संदर्भात सरपंच , उपसरपंच पदाचा अनुभव असलेले जेष्ठ सदस्य गप्प का ? या बाबद सत्तेत भागीदार असलेल्या जनता आघाडीच्या नेत्यांनी खुलासा करण्याची मागणी श्री डावरे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकाच्या शेवटी केली आहे.