साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जून 2020
अमरावती | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ यार्डात उद्यापासून (9 जून) भाज्या व फळांच्या घाऊक विक्रीसाठी मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊनमध्ये आवश्यक व्यवहारांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने शिथीलीकरण केले जात आहे. त्यानुसार बाजार समितीच्या आवारात घाऊक विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्डमध्ये प्रत्येक आठवड्याच्या रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार यादिवशी भाजीपाला बाजार सुरू राहील. फळबाजार व बटाटे- कांद्याची घाऊक विक्री ही सोमवार, बुधवार, शनिवार सुरु राहील. सर्व व्यापा-यांनी कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यार्डात केवळ घाऊक विक्री करता येईल. किरकोळ विक्रीची परवानगी नाही.
बाजार समितीच्या आवारात एकेरी वाहतूक ठेवण्याचे निर्देश आहेत. मुख्य यार्डातील मुख्य प्रवेशद्वार आवक करण्यासाठी वापरता येईल. या मार्गाने एकेरी वाहतूक पुढे जात फळे बाजार गेटने बाहेर जाईल.
मास्क असल्याखेरीज कुणालाही बाजार समितीत प्रवेश करता येणार नाही. प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था समितीने करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सचे व इतर उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश आहेत. या नियमांचा भंग झाल्यास बाजार सुरु करण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे आदेश दि. 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.