साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
श्रीरामपूर | काल गोंधवनीमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याच्या पार्श्वभुमीवर पुन्हा श्रीरामपूर शहर लॉकडाऊन करण्याची विनंती केली गेली आणि सदरची बाब सामजिक माध्यमांद्वारे व्हायरल झाल्यानंतर जनतेमध्ये घबराट निर्माण झाली परिणामत: बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाली त्यातच महांकाळ वाडगाव व निपाणी वडगाव येथे देखील एक एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले. या पार्श्वभुमीवर आमदार लहू कानडे यांनी आज सकाळी ११.३० वाजता प्रांतधिकारी कार्यालयामध्ये सर्व आधिका-यांची तातडीची बैठक घेतली.
या बैठकीसाठी प्रांतधिकारी आनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्यधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे आधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदी उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार निधीमधून ५२ थर्मल गन व ५२ ऑक्सिमीटरचे सर्व रुग्णालयांना वाटप करण्यात आले होते. व त्याचवेळेस आमदार लहू कानडे यांनी तालुक्याच्या सर्व घरांचा सर्व्हे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण भागातील ३६९७६ घरांचा सर्व्हे करुन २१३ आजारी व्यक्ती व 36 सर्दी, पडसे झालेले रुग्ण शोधण्यात आले. तसेच शहरी भागातील आशा वर्कर्सने १९३५० घरांचा सर्व्हे करुन ४२३ आजारी रुग्ण व ११ सर्दी, पडसे झालेले रुग्ण शोधून काढले.
कालच्या कोरोना पॉझिटिव्ह केस सापडल्याच्या पार्श्वभुमीवर पोलीसांनी गोंधवनीतील २०० मीटरचा परिसर सील करण्यात आल्याची महिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली. तर महांकाळ वडगाव, निपाणी वडगाव व गोंधवणी परिसरातील १.५ कि.मी. च्या परिघामधील प्रत्येक घराचा पुन्हा नव्याने सर्व्हे करण्याचे काम आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी हाती घेतले आहे. तालुका आरोग्यधिकारी डॉ.मोहन शिंदे स्वत: या कामावर देखरेख करीत आहेत. प्रांतधिकारी आनिल पवार यांनी शासन निर्णयाप्रमाणेच कोणता एरिया किती काळ बंद ठेवायचा हे ठरविण्यात येईल. तथपि, कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरामध्ये लॉकडाऊन केले जाणार नाही असे संबंधितांना कळविण्यात आल्याचे सांगितले.
आमदार लहू कानडे यांनी तहसिलदार तथा तालुका साथ नियंत्रण रोग आधिकारी श्री.प्रशांत पाटील यांना प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेमध्ये घबराट निर्माण होईल अशी कृती करु नये आणि आपल्या सर्वच कर्मचा-यांना जनतेला घाबरण्याऐवजी सावधानता बाळगून प्रत्येकाने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंग पाळणे आणि वारंवार हात धुऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन करावे असे सुचविले आहे. सर्व ग्रामस्तरावरील व शहरातील कर्मचा-यांनी सतर्क राहून आतापर्यंत जसे उत्तम काम केले तसेच सातत्यपुर्ण काम करावे अशा संदेश सर्वाना देण्याच्या सूचना केल्या.