साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 जून 2020
श्रीरामपूर | नगरपालिकेने सर्व व्यवसायांना परवानगी दिली आहे; परंतु नेहरू भाजी मार्केटला परवानगी दिली नसल्यामुळे अनेक वर्षापासून भाजी मंडईमध्ये भाजीपाला व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे, नेहरू भाजी मार्केट चालू करावे, अशी मागणी सोमवारी (दि. 22) नेहरू मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांनी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याकडे केली. भाजपाचे संघटन सरचिटणीस सतीश सौदागर, शहर उपाध्यक्ष गणेश परदेशी, महेंद्र शेटे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा आदिक यांना निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर नेहरू भाजी मार्केट मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून बंदच आहे. नेहरू मार्केट मधील किरकोळ भाजी विक्रेत्यांवर भाजी मार्केट बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यातील बरेचसे भाजी विक्रेते वयोवृद्ध असून ते फिरून भाजीपाला विक्री करू शकत नाही. नगरपालिकेने सर्व व्यवसायांना परवानगी दिली आहे ; परंतु, नेहरू भाजी मार्केटला परवानगी दिली नाही. सध्या शहराच्या विविध भागात काही लोक नव्याने भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यांना मात्र रस्त्यावर बसण्यास परवानगी आहे मात्र अनेक वर्षापासून मार्केटमध्ये भाजीपाला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असणारे भाजीपाला विक्रेत्यांची मात्र उपासमार होत असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी नेहरू मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांनी नगराध्यक्षा आदिक यांना याबाबत निवेदन देऊन नेहरू भाजी मार्केट चालू करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी नेहरू भाजी मार्केटमधील भाजीविक्रेते सतीश अहिरे, कैलास महाजन , ह.वा. बागवान ,सौ. सुशीला तरटे, सौ प्रभूने बाई, अंजनाबाई राहिले, सौ. आढाव सुरेखा लोखंडे, आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.