साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 मे 2020
श्रीरामपूर | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यापासून सगळीकडे लोकडाऊन असल्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात हजारो टॅक्सी रिक्षाचालक आहेत. या सर्वांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे शासनाने टॅक्सी रिक्षा चालकांना यांना 5 हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा, अशी मागणी राजीव गांधी चालक-मालक टॅक्सी युनियनचे अध्यक्ष संदीप मगर यांनी एका पत्रकाद्वारे शासनाकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मगर यांनी म्हंटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. टॅक्सी व रिक्षा बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनला जवळ जवळ 2 महिने होत आले आहे. या काळात आपला कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पदरी असलेली रक्कम खर्च झाली आहे. आता उसनवारी करून टॅक्सी व रिक्षाचालकांना आपली गुजराण करावी लागत आहे. उसनवारीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज होणार आहे. ते फेडण्याची चिंता लागली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टॅक्सी रिक्षा यांना 5 हजार रुपये बेरोजगार भत्ता द्या, अशी मागणी सरकारकडे केली होती ; तरी सरकारने टॅक्सी व रिक्षा वाल्यांच्या कुटुंबाकडे सहानभूतीने पाहून मदत करावी, अशी मागणी राजीव गांधी चालक-मालक युनियन अध्यक्ष संदीप मगर, उपाध्यक्ष युनूस भाई जमादार, अजय शेळके, राजू गायकवाड, हुसेन बागवान, अमजत बाबा, हनीफ पठाण, छोटू सय्यद, दीपक ढोकचौळे, सादिक पठाण, अरुण खंडीझोड, अनिल सगटगिळे, संजय बोरगे, राजू सोजवळ, अशोक दिवे, निलेश इनामके, मनोज काळे, राजू अग्रवाल, अशोक शेळके आदींनी मागणी केली आहे.