साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) रमजान महिन्यांमध्ये पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नगरपालिकेने नळांना पाणी न सोडल्यामुळे जनतेचे खूपच हाल झाले. त्यामुळे नागरिकांना शनिवारी कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. काल शुक्रवारी
काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे, पाण्याच्या टाक्या भरण्यास अडथळा निर्माण झाला. दरम्यान, नगरपालिकेने शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर मॅसेज पोस्ट करून शनिवारी (दि.9) सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले. वीजपुरवठा खंडित झाला तर थोडे उशिरा पाणी सोडायला हरकत काय?? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेतर्फे दर शनिवारी कोरडा शनिवार पाळला जातो. परंतु सध्या मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तो पाळला गेलेला नाही. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे 25 मे पर्यंत शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा केला जाईल असे नगरपालिकेने जाहीर केले होते.
त्यामुळे नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला धन्यवाद दिले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी शहराच्या काही भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. चार-पाच तास वीज गायब असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यातच रात्री अकरा वाजता नगरपालिकेमार्फत सोशल मीडियावर मेसेज टाकून शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.
वास्तविक पाहता थोडा उशिरा पाणीपुरवठा केला असता तरी लोकांना पाणी मिळाले असते. कारण रात्री अकरा पासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरायला भरपूर वेळ होता. सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना दररोज पाच वेळा वजू साठी पाण्याचा वापर करावा लागतो. शनिवारी पाणी येणार नाही याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे लोकांनी आहे ते पाणी वापरले. परंतु रात्री अकरा वाजता जेव्हा नगरपालिकेने सकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे जाहीर केले तेव्हा मात्र लोकांनी संताप व्यक्त केला.
शहरातील पाण्याचे दोन्ही तलाव भरलेले आहेत. भंडारदारा धरणातही मुबलक पाणी आहे. म्हणजे सध्या उन्हाळा असूनही पाण्याची कुठेच टंचाई नाही. प्रवरा कालवा सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहे. असे असताना रमजान महिन्याच्या पवित्र काळामध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली.
नगरसेवक ताराचंद रणदिवे यांची तत्परता
सकाळी 11 वाजता देखील नळांना पाणी न आल्यामुळे गुलशन चौक परिसरातील नागरिकांनी नगरसेवक ताराचंद रणदिवे यांना पाणी न आल्याबाबत विचारणा करून घरात पाणी नसल्याचे सांगितले . त्यांनी तातडीने नगरपालिकेचा टॅंकर पाठवून या परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.याबद्दल या भागातील जनतेने त्यांना धन्यवाद दिले.