Shrirampur : श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा बंद ; तहसीलदार प्रशांत पाटील यांचा आदेश

K
साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 मे 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील दि. 13 मे पासून मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने अटी शर्तीसह दिवसाआड  दुकाने सुरु झाल्यांनतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोशल डिस्टंसिंग राखण्यास दुकानदार व पालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे.  कलम 144 चे पालनही होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहिल्यास श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांचे जीविताचे रक्षण करण्यास प्राधान्य देऊन सुरु असलेली दुकाने तात्काळ बंद करावी, असा आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आज (दि.16) काढला. अवघ्या 4 दिवसात सुरु केलेली दुकाने बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.  

                 13 मे पासून नगपरिषद हद्दीतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर काही दुकाने दिवसाआड अटी शर्ती सह सुरु करण्यात आली होती. श्रीरामपूर तालुका हद्दीत लॉकडाउन लागू झाल्यापासून शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन झाल्यामुळे एकही कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला नाही.  


            शासनाच्या सुधारित आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरु होणे आवश्यक असल्याने सामाजिक अंतर राखून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  च्या प्रभावी अंमलबजावणीचे अधीन राहून इतर दुकाने उघडण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या ; परंतु दुकाने सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. पालिका प्रशासन दुकानदारांवर नियंत्रण ठेऊ शकले नाही. त्यामुळे, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आज शनिवारी नागरिकांच्या जीविताच्या रक्षणास सर्वोच्च प्राधान्य देऊन आधी सुरु असलेली जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू ठेऊन इतर दुकाने  बंद करण्याचा आदेश काढला. 
                 

Rajesh Borude

1 Comments

Previous Post Next Post