साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 मे 2020
अहमदनगर | जिल्ह्यात आज पुन्हा ०५ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ४९ झाली आहे.
संगमनेर येथील ५९ वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे एकूण पाच जण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३४ अहवालापैकी २८ अहवाल आज प्राप्त झाले. त्यात, २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०५ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.
दरम्यान, काल मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून धांदरफळ येथील बाधित व्यक्ती या मृत व्यक्तीच्या नात्यातील आहेत. तर संगमनेर येथील महिलेला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी तिचा घशातील स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. धांदरफळ येथील बाधित यांमध्ये
29 वर्षीय आणि पंधरा वर्षीय युवक तर 25 आणि १९ वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
दरम्यान, जे २३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यात धांदरफळ येथील ८, संगमनेर येथील ०४, पारनेर ०१, राहाता ०१, अकोले ०१, अहमदनगर ०२, जामखेड ०२, कोपरगाव ०१ आणि श्रीरामपूर येथील तिघांच्या अहवालाचा समावेश आहे.