Shrirampur : अजानला परवानगी मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाबद्दल मुस्लिम समाजात असंतोष

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. राज्यभरातून राज्य सरकारकडे मागणी केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी रमजान महिन्यानिमित्त मशिदीतून फक्त अजान देण्यास परवानगी दिली. मात्र मशिदीत नमाज अदा करण्यास परवानगी नाकारली. तरीदेखील मुस्लिम समाजाने आनंदाने सरकारची भूमिका मान्य केली. कोणीही मुस्लिम नमाजसाठी मशीदीत येणार नाही. मात्र नमाजची वेळ झालेली आहे हे घराघरात कळण्यासाठी मशिदीतून अजान देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. ती राज्य सरकारने मान्य केली. शेजारच्या परभणी, बीड आणि खुद्द मुंबईमध्ये मशिदीतून अजान दिली जात आहे. तेथील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी अजान देण्यास परवानगी दिली आहे. मात्र अहमदनगरमध्ये वारंवार मागणी करून देखील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

         अहमदनगर मधील काही  कार्यकर्त्यांनी या बाबत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नामदार नवाब मलिक तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे याकडे लक्ष वेधले आहे. श्रीरामपूरातील काही कार्यकर्त्यांनी नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. परंतु तरी सुद्धा या किरकोळ मागणीकडे शासनाचे मंत्री तसेच जिल्ह्याचे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मुस्लिम समाजामध्ये प्रशासनाबद्दल असंतोष वाढत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये व शेजारच्या बीड , परभणी या जिल्ह्यात पाचही वेळा मशिदीतून आजान देण्याची परवानगी दिलेली असताना व राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून हे जाहीर केलेले असताना जिल्ह्याचे प्रशासन मात्र गृहमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. फक्त अजाणसाठी परवानगी मागितली जात आहे आणि ती जर दिली जात नसेल तर समाजाचा असंतोष वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. त्यापूर्वीच प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन अहमदनगर जिल्ह्यात देखील मशिदीतून अजाण देण्यास परवानगी द्यावी. कोणताही मुस्लीम भाविक नमाजसाठी मशिदीमध्ये येणार नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजाने प्रशासनाच्या सर्व आदेशाचे पालन करीत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे याची जाणीव ठेवून प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाभरातील मुस्लीम समाजाने  केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post