साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 एप्रिल 2020
श्रीरामपूर |भंडारदरा आणि निळवंडे धरणातून शेतीसाठीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
धरणांतून प्रवरा नदी पात्रात के.टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले असून सध्या प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा भरत आल्याने धरणातून सोडलेले पाणी बंद होणार आहे सदरचे पाणी बंद न करता लगेचच शेतीचे आवर्तन सोडल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतात उभ्या पिकांना पाण्याची आवश्यकता असून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी फिडर ओव्हरलोड झाल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे तर शेतीसाठी आठ तास उपलब्ध होणाऱ्या वीज पुरवठ्यात दीड तास सक्तीचे भारनियमन चालू आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ना दुरुस्त झाले आहे आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या कामाला देखील तांत्रिक अडचणी निर्माण होतांना दिसत आहे. त्यातच अनेक परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी भरणे करणे अवघड झाले आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
शेतीचे या उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सात मार्चला झाले असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पहिले पाणी घेतले त्याला जवळपास तीस ते पस्तीस दिवसांचा कालावधी उलटल्याने आता शेतातली उभ्या पिकांना पाण्याची गरज आहे . भंडारदरा आणि निळवंडे धरणात पुरेसा पाणी साठा असल्याने नियोजीत शेतीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडणेकरिता कुठलेही अडचण नसल्याचे ससाणे यांनी सांगितले आहे.
प्रवरा नदीवरील बंधारे भरण्याकरिता केलेली मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्य केली त्याकरिता खा.सदाशिव लोखंडे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे यांनी देखील मदत करुन पाठपुरावा केल्याने नदीकाठच्या गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पिकांना वाचवण्यासाठी शेतीचे दुसरे उन्हाळी आवर्तन त्वरीत सोडण्याची मागणी नामदार थोरात आणि पाटबंधारे विभागाकडे केली असल्याचे ससाणे यांनी सांगितले.