साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढले आहे. अशा परिस्थितीत हातावरच्या लोकांचे, गरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करत स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ असल्याचे प्रतिपादन भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केली आहे.
वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळा जेवणाचे हाल सुरू झाले आहे. अशावेळी भाजप पदाधिकारी, बोटावर मोजण्याइतके नगरसेवक, सामाजिक संस्था, संघटना नागरिकांसाठी झटत आहेत. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा, वैद्यकीय सुविधा उभ्या करता याव्यात, जनजागृतीसह आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीला ५० लाख रुपये राज्य शासनाने दिले आहे. त्याचा वापर वेळ निघून गेल्यावर करण्यात येणार आहे का ? गेल्या महिनाभरात मतदार संघात झालेल्या फसव्या घोषणा देखील पूर्ण झालेल्या नाही. भुकेने नागरिक चिंतेत असताना ९ लाखांच्या डेटॉल साबण लोकांनी खायच्या का? त्याऐवजी रेशन कार्ड नसलेल्या लोकांना ९ लाखांचे धान्य का वाटले गेले नाही ? संपूर्ण मतदार संघात सॅनिटायझर, मास्क का दिले गेले नाही ? असा सवाल वर्पे यांनी उपस्थित केला आहे.
दानशूर लोकांच्या माध्यमातून गोळा केलेले सामान शहरातील गोंधवणी, बस स्टँड परिसर, केव्ही रोड, फकिरवाडा, नेवासा रोड, मोरगे वस्ती, बाजार तळ, कॅनॉल परिसरसह संपूर्ण शहरात गरीब व सामान्य नागरिकांना का वाटले गेले नाही ? असे अनेक प्रश्न सध्या जनतेपुढे उभे असून निवडणूक काळात खोटी आश्वासने देणारा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ पोरका झाल्याची खंत वर्पे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी भाजपाचे नेते श्री गणेश राठी, तालुकाध्यक्ष श्री सुनील वाणी, मा शहराध्यक्ष मारुती बिंगले, विशाल यादव, विशाल अंभोरे यांनी व्यक्त केली आहे.