साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 एप्रिल 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित करून देशाला संबोधित केलं. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले. हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले की, 22 मार्चला देशवासियांनी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती केलेल्या धन्यवादाचे अनेक देश अनुकरण करत आहेत. यावेळी देशाच्या सामूहिक शक्तीचं दर्शन आपण दाखवलं. देश एक होऊन कोरोना विरोधात लढाई लढतोय. लोकडाऊनच्या काळात आपण आपण एकटे नाहीत. 120 कोटी देशवासियांची ताकत आपल्या सोबत आहेत, असं मोदी म्हणाले.